अवैध दारू वाहतूक करताना पोलिसांनी कार पकडली; एक जण ताब्यात
विजय चिडे/ पाचोड : पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील अमृत हाँटेल जवळ पाचोड पोलिसांनी एका चारचाकी वाहनांमध्ये देशी दारुचे २० बाँक्स पकडून ७६ हजार ८०० रूपयांची दारू पकडली असून एकास ताब्यात घेऊन कारवाई केल्याची घटना (दि.२०) रोजी रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे. सदर कारवाईत एकूण पाच लाख सव्वीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहीती अशी की, धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मुरमा शिवारातील अमृत हॉटेल समोर एक चारचाकी गाडी (क्रमांक.एम.एच. २० एफ.जी. ०१४० ) या गाडीमध्ये अधैवरित्या देशी दारु विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान पाचोड पोलिसांना मिळाली असता पोउनि सुरेश माळी, पो.ना.गोरखनाथ कणसे, पो.ना.पगारे, भगवान धांडे यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी ताब्यात घेऊन पाहणी केली असता यागाडी मध्ये एकूण देशी दारूचे वीस बॉक्स आढळून आले.
यामध्ये अंदाजे ७६ हजार ८०० रुपये किंमतीची दारू मिळून आली असून नवनाथ श्रीमंत बोडखे (वय ३३,रा. चिंचाळा ता.पैठण) यास ताब्यात घेऊन चारचाकी वाहनासह एकूण ५ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करत आहे.