पाऊस आला धावून, शेत गेले वाहून! मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान
विजय चिडे/ पाचोड : शेतीचा हंगाम हा बेभरवशाचा खेळ आहे.कधी होत्याचे नव्हते होईल. याचा कधीच नेम अथवा अंदाज बांधता येत नसतो.नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा तंतोतंत आणि खरं ठरवलं आहे.पदरात पडण्यापूर्वीच शेतामधील उभी पिके डोळ्या देखत वाहून गेल्याचे दृश्य शेतकऱ्यांनी बघितले तर त्यांची केविलवाणी झालेली वाईट अवस्था न बघण्यासारखी होती. एकदम ओढावलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे स्वप्न पण वाहून नेले. हे प्रसंग आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंचे विदारक चिञ ढगफुटीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीतून समोर आल्याचे पाहावयास मिळते.
गत वर्षी अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतले. यंदा चांगले उत्पन्न निघून मागची नुकसानभरपाई भरुन काढण्याच्या तयारीत असतांना दहा बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आंतरवाली खांडी सह पैठण परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटी सारख्या पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशःपाणी फिरवले.पाऊस इतका पडला की शेतातील पिके पाऊसा समोर तग न धरु शकल्याने पिके पावसाच्या प्रवाहात वाहून उध्वस्त झाली. यंदा सुरूवातीला शेतकऱ्यांना दिलासा देत आगमन केलेल्या पावसाने नंतर दडी मारुन बळीराजाला आकाशाकडे डोळे लावत प्रतिक्षा करण्यास भाग पाडले. धडकी भरविल्यानंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारात खरीप पिके डोलू लागली होती. मात्र भविष्याचे स्वप्न रंगवीत मोठ्या उत्साहात विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे विघ्न आल्याने पुरातच खरिपाचं पिके वाहून गेलं आहे. सततच्या नापिकीतून सावरण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या बळीराजाला यंदाचा तरी हंगाम तारेल, साधेल असे वाटत होते. परंतु जूनमध्ये केलेली पेरणी फळाला येण्यापूर्वी अतिवृष्टीच्या घशात गेली. दीड वर्षापासून कोरोनाचे संकट पाठ सोडायला तयार नाही. त्यात आता निसर्ग कोपल्याने ओल्या दुष्काळानं गाठलं आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला हजेरी लावलेल्या पावसाने एका सप्ताहात होत्याचं नव्हतं करुन उघड्यावर पाडलं आहे. तालुक्यातील पाचोड, नांदर ,विहामांडवा आडूळ भागात अतिवृष्टी व त्यानंतर ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वञ तांडव केले. या नैसर्गिक आपत्तीने रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची क्षणातच डोलदार पिके हिरावून नेली. यावर्षी तालुक्यात पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. महसूल विभागाने काढलेल्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील ७० हजार हेक्टर बाधित झाली. तालुक्यात नजरा शासनाच्या घोषणेकडे व पीकविमा कंपनीच्या मदतीकडे लागल्या. पीकविमा धारक असणारे बाधित शेतकरी विमा कंपनीच्या सूचनेनुसार मदत केंद्राशी फोनवर संपर्क करीत असून, त्यातही अनेकांकडे मोबाईल नाहीत. संपर्कात व्यत्यय येत असल्याने दिलेल्या मुदतीत कंपनीकडे नोंद न झाल्यास विमा मिळणार की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पाण्याच्या प्रवाहामुळे या शेतातील कपाशीचे पिकही खरडुन गेले. त्यामुळे त्यांच्यावर चांगलेच आर्थिक संकट ओढवले आहे. या मुसळधार पावसाचा फटका या शिवारातील शेतकऱ्यांना बसला आहे. कारण सर्वदूर बरसलेल्या या मुसळधार पावसामुळे काही शिवारातील नाल्यांना व नदीला पूर आला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून संबंधित शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. – नवनाथ कळमकर (उपसरपंच, आंतरवाली खांडी)
शेतांना अक्षरशः आले तळ्याचे स्वरुप…
ढगफुटीच्या पावसाने सर्वञ हाहाकार उडवला आहे. जिकडे पहावे तिकडे पाणी वाहत आहे. नदी, नाले तर प्रवाहीत झाले आहेतच शिवाय नद्या, विहीरी, नाले, तलाव, तुडूंब असून, अनेकांची बोअरवेल्स वाहत आहेत. अनेकांच्या वावराला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतीं अक्षरशः पाण्याखाली बुडाल्याने जागोजागी शेतकऱ्यांच्या शेतात तुंबलेल्या पावसाचे दृश्य हे तलावासारखे वाटत असल्याचे चिञ सद्या पाचोड परिसरात पाहावयास मिळते.