कृषी
एकात्मिक शेती पध्दतीमुळे पोषणमुल्यांची सुरक्षितता वाढली: कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकर्यांमध्ये आत्मविश्वास वाढला
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतकर्यांना शाश्वत उत्पादन व उत्पन्न मिळतेच पण या व्यतिरिक्त त्यांना सकस अहारही मिळतो. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकर्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम कार्यक्रमाच्या खरीप पीक प्रात्यक्षिक भेट व शेतकर्यांबरोबर सुसंवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील भा.कृ.अ.प.-कृषि तंत्रज्ञान व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग उपस्थित होते. यावेळी व्यसपीठावर शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वय डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषि अधिकारी श्री. महेंद्र ठोकळे, तांभेरेचे सरपंच नितीन गागरे, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की पारंपारिक शेतीला दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन या व्यवसायांची जोड देऊन शेतकरी एकात्मिक शेती पध्दतीद्वारे शाश्वत उत्पन्न मिळवू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण युवकांनी रोपवाटीका, आधुनिक सिंचन पध्दती, शेतीचे यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात उतरणे क्रमप्राप्त आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना संचालक डॉ. लाखन सिंग म्हणाले शेतकर्यांनी शेती करतांना तंत्रज्ञानाची साथ घ्यावी व शास्त्रीयदृष्ट्या शेती करावी. शेतकर्यांनी विस्तार अधिकारी आणि कृषि शास्त्रज्ञांशी संपर्क ठेवावा. शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतावर राबवावे. शेतकर्यांनीसुध्दा आपल्या शेतामध्ये नवनविन शेतीविषयक प्रयोग करावे. शेतकरीसुध्दा शास्त्रज्ञ असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांनबद्दल शेतकर्यांना माहिती दिली. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी ताराचंद गागरे, मारुती गिते, प्रविण गाडे यांनी भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम कार्यक्रमामुळे त्यांच्या शेतीत झालेले फायदे याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते शेतकर्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे वितरीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या विविध खरीप पीक प्रात्यक्षिकांना भेट दिली. यामध्ये चिंचविहिरे येथील दालमिल युनिट, चिंचविहिरे येथील सौ. सविता नालकर यांच्या एकात्मिक शेती पध्दतीला भेट, मच्छिंद्र शेटे यांच्या डाळिंब बाग व शेततळ्यास भेट, कणगर येथील राजेंद्र वरघुडे व प्रविण गाडे यांच्या एकात्मिक शेती पध्दतीला भेट व तांभेरे येथील ताराचंद गागरे यांच्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकास भेट दिली.
याप्रसंगी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. अनिल दुरगुडे, राहुरी मंडल कृषि अधिकारी जयंत जाधव, प्रगतशील शेतकरी भास्कर वरघुडे उपस्थित होते. या कार्यक्रमास तांभेरे, चिंचविहिरे, कानडगाव आणि कणगरचे शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले तर आभार विजय शेडगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कोर्हाळे आणि किरण मगर यांनी परिश्रम घेतले.