अंबड तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा- निसार पटेल
विजय चिडे/ पाचोड : गत आठवड्यात घनसावंगी मतदारसंघात संततधार व अती मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खरीप पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तीयाज जलील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी व जालना जिल्हा अध्यक्ष शेख माजेद भैयाजी यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी (दि.१३) रोजी जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल यांनी घनसावंगीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मागील आठवड्यात घनसावंगी मतदारसंघात संततधार व अती मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खरीप पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. व तसेच जनवारे पुरात वाहुन गेल्याने व घरांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुन राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये व फळबागाला हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी व पिक विमा कंपन्यानां बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम तात्काळ जमा करावी असे आदेश शासनाने संबंधित कंपन्यांना देण्यात यावेत व तसेच घरांची पडझड झालेल्या व जनवारे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पण मदत जाहीर करण्यात यावी व पंचनामे न करता तात्काळ सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना घनसावंगी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. पंधरा दिवसात मदत जाहीर न केल्यास घनसावंगी येथे आंदोलन करण्यात येईल व पालकमंञी यानां मतदारसंघात एमआयएम पक्ष फिरु देणार नाही असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जालना जिल्हा उपाध्यक्ष निसार पटेल, तालुका उपाध्यक्ष शेख निजाम, शहराध्यक्ष ईमरान पठाण, गुरफाण फारुकी, नशीर पठाण, रियाज शेख, मुबारक पठाण, भास्कर पाटोळे, शेख हसण, शमशद पठाण, सय्यद शरीफ, शेख निसार, हरीश मौलाना, उसमान पटेल सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.