अहिल्यानगर

लोणी खुर्द येथे दक्षिणमुखी मारुती मंदिर जिर्णोद्धार बैठक संपन्न

असे असणार लोणी खुर्द येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर…

दक्षिणमुखी मारुती मंदिर जिर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी सरपंच घोगरे तर उपाध्यक्षपदी आहेर यांची सर्वानुमते निवड
लोणी खुर्द : गावात पारंपरिक दक्षिण मुखी हनुमान मंदिर असुन ते गावाचे ग्रामदैवत आहे. बर्‍याच दिवसांपासून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असुन गावातील नागरिकांची या मारुती मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा अशी मागणी आहे.
रविवार १७ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता गावात दवंडी देऊन गावातील ग्रामस्थ चांगदेव गावकरी यांच्या सुचनेवरुन तर साहेबराव आहेर यांनी अनुमोदन दिल्यावरुन लोमेश्वर मंदिरात जेष्ठ ग्रामस्थ आबासाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामदैवत दक्षिणमुखी मारुती मंदिर जिर्णोद्धार बैठक संपन्न झाली.
बैठकीचे प्रास्तविक करताना श्रीकांत मापारी यांनी सांगितले की, गावातील मारुती मंदिर हे दक्षिणमुखी असुन परिसरातील अनेक भक्तगणाचं ते श्रध्दास्थान आहे तसेज गावाचं ग्रामदैवत आहे. या ग्रामदैवताच्या जिर्णोद्धारासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा सदाशिव लोखंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपासाठी काही निधी उपलब्ध झालेला असुन उर्वरित काम आपल्याला लोकवर्गणीतुन करावयाचे असुन यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. 
बैठकीत बोलताना बापूसाहेब आहेर म्हणाले की, आपल्या गावाची लोकसंख्या आज तिस ते पस्तीस हाजारापर्यत असुन आपल्या गावाचे व्यापक स्वरुप पाहता या दक्षिणमुखी मारुती मंदिराचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून भाविकातुन जिर्णोद्धाराची मागणी होत आहे. या मंदिर जिर्णोद्धारवर बोलताना ते पुढे म्हणाले सन १९७२ ला सद्गुरू योगिराज महंत गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या लोणी खुर्द गावात भूमिपुत्र स्वर्गीय आमदार चंद्रभान दादा घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी दुष्काळ असताना गावातील तत्कालीन तलाठी श्री जगदाळे यांच्या माध्यमातुन गावातील नागरिकांच्या नावे चारा तगाई काढुन हा मोठा सप्ताह करण्यात आला. तेव्हा पासुन पुढे या योगिराज महंत गंगागिरी महाराज सप्ताहाची व्याप्ती वाढल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करुन दिली. त्यामुळे हा जिर्णोद्धार देखील गावाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
यानंतर जेष्ठ मार्गदर्शक एकनाथराव घोगरे यांनी या जिर्णोद्धार बाबत सविस्तर मार्गदर्शन करताना सांगितले की, आपले हे मंदिर करताना सर्वच गावाचा सहभाग महत्वाचा आहे. हे मंदिर गावाचे म्हणजे आपल्या सर्वांचे आहे. या जिर्णोद्धारातुन गावाच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. यासाठी आम्ही सर्व तो परीने मदत करणार असुन या जिर्णोद्धारासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर संजय आहेर यांनी जिर्णोद्धाराचे नियोजन करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एक जिर्णोद्धार समिती स्थापन करावी अशी सुचना मांडली. त्यावेळी जिर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी सरपंच जनार्दन घोगरे तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब आहेर व सेक्रेटरी म्हणून प्रभाकर कोळगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व गावातील सर्वच भागातील एक एक प्रतिनिधीची सदस्य म्हणून जिर्णोद्धार समितीत समावेश करण्यात आला.
यावेळी आर्किटेक्ट सचिन ब्राम्हणे यांनी मंदिराची रचना कशी असेल या बाबत उपस्थितांना माहिती दिली. लोणी खुर्द ग्रामपंचायत व लोणी खुर्द सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह गावाच्या वतीने सर्वच संस्थाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व पदाधिकारी व गावातील सर्व जेष्ठ ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button