गुन्हे वार्ता

तरुण शेतमजुराचा धारदार शस्त्राने वार करून खुन

 

ढोरकीन शिवारातील घटना

विलास लाटे/पैठण : तालुक्यातील ढोरकीन-दिन्नापुर रस्त्यावर ढोरकीन शिवारातील शेतवस्तीवर शेतमजुराचा अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. संदीप सुर्यभान साळवे (वय २५ रा.आंबेडकरनगर औरंगाबाद) असे हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संदीप साळवे हा ढोरकीन शिवारातील गट नं. ३३७ मधील किरण पेरकर यांच्या शेतात शेतीची देखभाल करण्यासाठी कामाला होता. तो शेतामध्येच बांधलेल्या रुममध्ये एकटाच रहात होता. शनिवारी सकाळी पेरकर यांच्या शेतवस्तीवर असलेल्या घरासमोरील उकीरड्यावर संदीप साळवे यांचा मृतदेह आढळून आला.साळवे यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार होते. शुक्रवारी मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकरींनी तो झोपलेला असताना त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यास मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. एमआयडीसी पोलिस गुन्ह्यातील फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलिस निरीक्षक खेतमाळस यांनी घटनास्थळी भेट दिली.खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राधाकिसन साळवे यांच्या फिर्यादीवरून पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकरींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक चौरे, बिट जमादार दिनेश दाभाडे, राजेश चव्हाण, तुकाराम मारकळ सह एमआयडीसी पोलिस करत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button