गुन्हे वार्ता

डी.वाय.एस.पी मिटके यांच्यावर निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीराहुरी येथे एका प्रतिष्ठित महिलेचे अपहरण करून बंदुकीच्या जोरावर मारहाण करण्याऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. संबंधित अधिकाऱ्याने खोटा गुन्हा दाखल का केला? असे विचारत संबंधित प्रतिष्ठित महिलेच्या घरी गोळीबार करून धुडगूस घातला. संबंधित महिलेच्या मुलांना डांबून ठेवले असता त्यांना वाचविण्यास गेलेले श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला. या घटनेत उपअधीक्षक मिटके हे थोडक्यात बचावले.

या बाबत समजलेली माहीती अशी की, गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास डिग्रस येथील त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर रोखून धरले होते. महिलेने प्रसंगावधान राखत मोबाईल वरून परिचितांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे थोड्याच वेळात पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला. उपअधीक्षक मिटके हे दाखल झाले. सुमारे दोन तास हे नाट्य सुरू होते. अखेर त्यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिवाल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, ती अधीक्षक मिटके यांचा डोक्या जवळून गेली.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीने खंडणी मागितली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी निलंबित पोलीस अधिकाऱ्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button