अहिल्यानगर
चिंचोलीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब लाटेंची निवड
चिंचोली प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली गावच्या तंटामुक्त अभियान समितीच्या अध्यक्षपदी अखेर बाळासाहेब चांगदेव लाटे यांची ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात या निवडीवर गावकऱ्यांनी शिक्कामोर्तब केले.
चिंचोली येथील तंटामुक्ती अभियान समितीचे अध्यक्षपद पद्मश्री विखे पा. कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे यांच्या निधनाने गेल्या दहा महिन्यापासून रिक्त होते. कोविड प्रादुर्भावामुळे ग्रामसभांना परवानगी नसल्याने हि निवड रेंगाळली होती. पोपटराव लाटे यांच्या कारकीर्दीत अनेक छोटेमोठे वाद स्थानिक पातळीवर परस्पर सामंजस्याने मिटवले जात असल्याने शासकीय पातळीवर गावाला तंटामुक्त घोषित करुन बक्षीसही मिळाले होते.
या रिक्त असलेल्या जागेसाठी तहसीलदारांच्या आदेशान्वये आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात लोकनियुक्त सरपंच गणेश हारदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक गाडे यांनी सभेचे प्रयोजन विषद करत अध्यक्षपदासाठी नांवे सुचविण्याची सुचना मांडली. त्यात तीन नांवे ग्रामस्थांनी सुचविली त्यात बाळासाहेब लाटे यांच्या नावावर ग्रामस्थांमधून एकमत होवून लाटे यांचे नाव अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले तर अन्य काही सदस्यांचे निधन झाल्याने त्यांचे जागेवर अन्य सदस्यांच्याही निवडी करण्यात आल्या.
बाळासाहेब लाटे दिवंगत अध्यक्ष पोपटराव लाटे यांचे कनिष्ठ बंधू असून त्यांचाही ग्रामस्थांमध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्याचा फायदा गावातील वादविवाद मिटविण्यासाठी होणार असल्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. प्रसंगी ग्रामस्थांनी या ग्रामसभेला भरगच्च उपस्थिती दाखविली मात्र कोविड नियमांचे पालन होताना दिसले नाही.