प्रासंगिक
युवकांनी काजव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हावं…!
राष्ट्राचं भविष्य हे तरुण पिढीवरच अवलंबून असून युवक हेच राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. परंतु आज बेरोजगारी, गरिबी व लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा अशी अनेक आव्हाने युवकांपुढे आहेत. तसेच काही तरुण हे राजकीय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत असतात. परंतु फक्त फायद्यासाठी काही युवकांचा काही राजकीय मंडळी वापर करून घेत असतात याची अनेक उदाहरणे आहेत. आज काही तरुण फक्त कट्टर समर्थक, उजवा हात, निकटवर्तीय म्हणून काम धंदा सोडून राजकीय मंडळींच्या दावणीला बांधलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यातील प्रत्येक तरुणाला स्वतः कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे राजा बोले दल हाले अशीच काहीशी अवस्था आज काही युवकांची झाली आहे.परिणामी स्वकर्तृत्व, स्वाभिमान, स्वावलंबन या शब्दांना अर्थ उरत नाही. आज एखाद्या नेत्याला अटक झाली तर दगडफेक करायला, जाळपोळ करायला, हानामारी करायला काही तरुण खूप तत्पर व सर्वात पुढे असतात व त्यांच्यावरच गुन्हे दाखल होऊन भविष्यात त्यांनाच या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागतो. सर्वात वाईट मला एका गोष्टीचे वाटते कि शेतमालाचे भाव कमी झाल्यावर, दुधाचे दर कमी झाल्यावर, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यावर, आपल्या मूलभूत हक्क, स्वातंत्र्यावर गदा आल्यावर, थोडक्यात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लढण्यासाठी आज तरुण एवढी तत्परता दाखवत नाही जेवढी राजकीय नेत्याला अटक झाल्यावर दाखवतो हीच मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे युवकांनी वळवळ करून दुसऱ्याच्या जीवावर मोठं होण्याचं स्वप्न बघण्यापेक्षा चळवळीतुन स्वकर्तृत्व निर्माण करावं. युवकांनी कुणाच्याही प्रलोभनांना बळी न पडता आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या त्या क्षेत्राला न्याय देण्यासाठी कायद्याची चौकट न ओलांडता लढलं पाहिजे.
आज अनेक तरुण शेती व्यवसायात आहेत तर काही तरुण विविध क्षेत्रात नोकरीस आहेत. मात्र शेतीची अवस्था सध्या खूपच बिकट आहे व नोकरीही ठराविक युवकांना पर्मनंट आहे. बाकी सर्व कंत्राटी कामगार त्यामुळे त्यांनाही भविष्य नाही. परिणामी शेती परवडत नाही म्हणून नोकरीसाठी बाहेर शहरात गेलेले काही तरुणांची अवस्था आगीतुन उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. परंतु गरजवंतास अक्कल नसते त्यामुळे सरकार व जबाबदार घटक सर्वांना या गोष्टी माहित आहेत मात्र तेही मूग गिळून गप्प आहेत. आजच्या युवकांनी एकत्र येऊन या प्रश्नांसाठी लढा दिला पाहिजे. आपली एकजूट नसल्याने आपला तोटा होत आहे. सहनशिलतेचा अंत हा नक्कीच असतो त्याला किती दिवस, वर्ष, पिढ्या जातील हे नक्की सांगता येणार नाही. मात्र ज्या दिवशी सहनशिलतेचा अंत होईल त्या दिवशीचा तरुण हा एक तर आपल्या मागण्या मान्य करून ताट मानेने चालेल किंवा एखाद्या कट्टर संघटनेचा सदस्य असेल. त्या दिवशी तो मानवतेचा दुश्मन नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्क व स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या व्यवस्थेचा दुश्मन असेल. राष्ट्राचे भविष्य हे युवकांच्याच हातात असून त्यांचा सर्वांगीण विकास राष्ट्रास नक्कीच तारील यात तिळमात्र शंका नाही.
क्रांतीसेना, संगमनेर