महाराष्ट्र
आरक्षणाशिवाय महिलांनी कर्तृत्व व नेतृत्व सिध्द केले आहे – डॉ. भारती चव्हाण
एनडीएमध्ये मुलीही परिक्षेस पात्र निकाल दिल्याबद्दल मानिनी फाऊंडेशनने मानले मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार
पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परिक्षेस बसण्यास मुलीही पात्र असल्याचा निकाल दिला आहे. त्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व युवती, महिला भगिनींनीच्या वतीने मानिनी फाऊंडेशनने आभार व्यक्त करीत आहे. महिलांनी यापुर्वीही आरक्षणाशिवाय धर्मकारण, राजकारण, शिक्षण, क्रीडा, साहित्य, शेती, उद्योग, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने आपले कर्तृत्व व नेतृत्व सिध्द केले आहे.
अनादीकाळापासून भारतात महिलांचे नेतृत्व वादातीत आहे. यामध्ये महिलाप्रधान संस्कृतीच्या जनक बृहदारण्यकोपनिषदात ज्यांचा सन्मानाने उल्लेख आहे अशा मैत्रेयी गार्गी, स्वराज्याच्या जनक राजमाता जिजाऊ, युध्दनिती निपुन झाशीची राणी, कुशल प्रशासक अहिल्याबाई होळकर, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी, सुवर्णकन्या पी.टी. उषा, अंतराळवीर कल्पना चावला तसेच सुनिता विल्यम्स या अत्युच्च व्यक्तीमत्वांचा अल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले. प्राधिकरण येथे मानिनी फाऊंडेशनच्या झालेल्या बैठकीत डॉ. भारती चव्हाण बोलत होत्या. यावेळी कल्याणी कोठुरकर, सुनिता शिंदे, रुबेका अमोलीक, शोभा चव्हाण, द्रौपदी सोनवणे, शांती गवळी, साधना दातीर, अरुणा सेलम, साधना सलगर, रजनी मगर, यशश्री आयार्य, सविता मोरे, मालती काळे आदी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की, लोकनेते माननीय शरद पवार केंद्रिय संरक्षणमंत्री असताना प्रथम त्यांनी संरक्षण खात्यात महिलांना प्रवेश दिला. आता लाखो महिला शिक्षण, उद्योग, व्यवसायात पुढे येऊन कुटूंबाबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग होऊ पहात आहेत. त्यामुळे महिलांना कोणत्याही आरक्षणाच्या मर्यादा नको आहेत. सर्वच क्षेत्र त्यांना खुली झाली पाहिजेत. महिला मनाने व शरीराने कमकुवत नसून सर्वच क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम आहेत. तसेच सेवाभाववृत्ती, संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, समय सुचकता, सहनशक्ती, प्रामाणिकपणा, व्यवहारिक चातुर्य, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी, संकटाचा सामना करण्याचे मनोध्यैर्य महिलांमध्ये असते असे मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.