शिक्षणवारी ज्ञान पंढरी
बारावी नंतर काय ? जैवतंत्रज्ञान या विषयात करीयरच्या संधी
लोणी/ प्रतिनिधी :- बारावीनंतर पुढे काय करावं असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यंच्या पालकांना नेहमीच पडत असतो तसेच अनेक पर्याय विद्यार्थीपुढे उपलब्ध आहेत मात्र, भविष्यात भरपूर संधी उपलब्ध असणारा पर्याय तरुणाई निवडतांना दिसते. बहुतांशी विद्यार्थींचा कल अभियांत्रकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे जास्त असतो. मात्र असे काही करियरचे पर्याय आहेत जे भविष्यात मोठी संधी आणि नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. यात बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैवतंत्रज्ञान हा करियरचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बायोटेक्नॉलॉजी अर्थात जैवतंत्रज्ञान हि जीवशास्त्र विषयामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली अलीकडच्या काळात निर्माण झालेली शाखा आहे. परंतु, अतिशय अल्पशा कालावधीमध्ये भारताबरोबरच संपूर्ण जगात त्याचा विस्तार वेगाने होऊन जैवतंत्रज्ञान या शाखेचा अनुप्रयोग अभ्यासक्रमामध्ये होत आहे जसे कि नील जैवतंत्रज्ञान – सागरी जैवतंत्रज्ञान, हरित जैवतंत्रज्ञान –कृषी जैवतंत्रज्ञान, लाल जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, श्वेत जैवतंत्रज्ञान आणि औद्योगिक जैवतंत्रज्ञान. हा सर्व अभ्यासक्रम भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे बी. टेक., बी. एस्सी., एम. टेक., एम. एस्सी. व पीएचडीच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना निवडण्याची संधी देत आहेत.
जीवशास्त्र विषयात रस असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञाना सारख्या शाखेत प्रवेश घेऊन अल्प शुल्कात करियर च्या उत्तम संधी उपलब्ध आहेत, त्याच प्रकारे मेडीकल अभ्यासक्रमामध्ये ठराविक जागा आणि त्यांत लागणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थीना जैवतंत्रज्ञान हा उत्तम पर्याय ठरतांना दिसून येत आहे. जैवतंत्रज्ञान हे क्षेत्र केवळ जीवशास्त्र किंवा तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित नाही तर यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जेनेटिक्स, माइक्रोबायलॉजी, गणित, बायो इंफोर्रमेटिक, पर्यावरण शास्र, ऍनिमल बायोटेक अश्या अनेक विषयांचा अभ्यास केला जातो व हे सर्व विषय जैवतंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग आहेत व त्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठीही विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवणे व संशोधन क्षेत्रात काम करणे अधिक सोयीस्कर व सुलभ झाले आहे.
भारतामधील मधील बंगळूरू हे शहर ‘बायोटेक्नोलॉजी हब’ म्हणून ओळखले जाते येथे बायोटेक्नोलॉजीवर अवलंबून असणाऱ्या कंपन्यांचा वार्षिक कारभार हा दीड हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. काही दिवसांमध्ये भारतामध्ये बायोटेक्नोलॉजीच्या विविध क्षेत्रामधील काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या आठशे च्या वर पोहचली आहे. यामध्ये बायोफार्मा (उपचारात्मक लस व निदान, प्रतिजैविके निर्माती, बायोसर्वीसेस (करार संशोधन संस्था, सानुकूल उत्पादन, वैद्यकीय चाचण्या), बायोअग्री (उती संवर्धन, संकरित बियाणे, बायो-खते, जैव कीटकनाशके, जनुकीय सुधारित पिके, फूड इंडस्ट्री), बायोइंडस्ट्रियल (औद्योगिक एंजाइम, स्टेम सेल निर्मीती) व बायोइनफॉर्मेटिक्स (डेटाबेस सेवा, इंटिग्रेटेड रिसर्च ऍप सॉफ्टवेअर, बायोटेक सॉफ्टवेअर सेवा), तसेच सध्याच्या कोरोना संसर्गामुळे उधभवलेल्या परीस्थितीतून फार्मा बायोटेक कंपन्यामध्ये ही कार्यरत आहेत व त्यामध्ये नोकरी करण्याची खुप मोठी संधी उपलब्ध झाली आहेत.
याव्यतिरिक्त जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बीएस्सी किंवा एमएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना उद्योगात प्रवेश मिळू शकतो. फील्ड जॉब (प्रशेत्र भेटी) द्वारे बीएस्सी/ एमएस्सी झालेले विद्यार्थी खासगी संस्थांसाठी काम करू शकतात. बायोटेक/अप्लाइड लाइफ सायन्समध्ये मास्टर डिग्री करणारे विद्यार्थी अध्यापन, संशोधन, विस्तार इ. क्षेत्रात देखील नोकरी करू शकतात. जैवतंत्रज्ञानामध्ये पदवी नंतर पदुत्तर पदवी घेऊन विक्री किंवा मार्केटिंगचे काम करता येऊ शकते. संशोधक म्हणून काम करण्यासाठी पदव्युत्तर पदवी गरजेची असते व त्यात पी.एच.डी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या नूतन आर्धीनियामा नुसार माध्यमिक शाळा मध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधारक उमेदवार माध्यमिक शिक्षकाच्या नौकरीसाठी पात्र ठरणार आहेत. कृषी विद्यापीठांद्वारे केलेल्या बी. टेक./ एम.टेक. पदवीधर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये रुजू होता येते.
उच्च शिक्षणासाठी भारत व इतर पुढारलेल्या देशात जैवविज्ञान (लाईफ सायन्सेस) शाखेमध्ये जैवतंत्रज्ञान विषयासाठी विशेष प्राधान्य दिसुन येते. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थीनी थोडे प्रयत्न करुन इंग्लिश विषयी काही परीक्षा ( टोफेल, जी.आर.ई, आय.एल.टी.एस, जी.एट, ई. ) दिल्यास प्रवेश व शिष्यवृत्तीची संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जीवशास्त्र व त्याबरोबरच तंत्रज्ञान विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान विषयात शिक्षण घेण्याच्या संधीचा विचार नक्कीच करायला हवा……
प्रा.अमोल रमेश सावंत आणि
प्रा.स्वप्नील सुनील नलगे
सहायक प्राध्यापक
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी