देवळाली प्रवरा प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेकायदेशीर पालक शिक्षक संघ तात्काळ बरखास्त करा, अन्यथा पालक शिक्षक संघाची अनधिकृत कार्यकारिणी व शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाकडे तक्रार करावी लागेल अश्या मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी शाळेचे मुख्याध्यापक गुंड यांना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिले आहे.
व्हिडिओ : पालक शिक्षक संघ बरखास्त करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा ढुस यांचा इशारा.
विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथील आयटी विषयाच्या विद्यार्थ्यांनी ढुस यांच्या नेतृत्वाखाली दि. २४ ऑगस्ट रोजी विद्यालयास निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची तात्काळ दखल घेत विद्यालयाकडुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयाचे ढुस यांनी स्वागत केले असुन प्राचार्य व प्राध्यापक यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.
या प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, येथील आय टी विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे चकरा मारीत असून केवळ आय टी विषयाचे बारावीचे शुल्क भरायचे बाकी राहिल्याने विद्यालय विद्यार्थ्यांना दाखले देत नव्हते. कोरोनामुळे गत वर्षी आय टीचे वर्गच भरले नाहीत, तसेच कोरोनामुळे सर्व पालक आर्थिक संकटात असल्याने या विषयाची फी माफ करावी व पुढील शिक्षणासाठी दाखले मिळावेत इतकीच माफक अपेक्षा या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे पालक शुल्क भरू शकत नाही तर दुसरीकडे पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. वास्तविक पाहता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समस्या सोडविण्याची आणि शाळेचे शुल्क निश्चित करण्याची सर्व जबाबदारी ही त्या शाळेतील पालक शिक्षक संघाची असते. पण केवळ मुलांपुढे फुकटचे पुढारपण उपभोगायला मिळते म्हणून गावातील पालक नसलेल्या काही ठराविक मंडळी बेकायदेशीररित्या कित्येक दिवसांपासून या कार्यकारिणीवर ठाण मांडून बसल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की काय समस्या आहेत याचे यांना काही सोयरसुतक नाही. कडक कपड्यात मुलांपुढे मिरवायचे आणि मुलांना अपेक्षित नसलेली भाषणे ठोकून किंवा अनाधिकाराने मुलांच्या परीक्षेत घुसखोरी करून त्यांच्या कॉप्या तपासून मुलांवर धाक जमविणे सारखे उद्योग येथे होत असल्याच्या तक्रारी मुलांकडून ऐकायला मिळतात. शाळेतील शिक्षकांवर व येथील विद्यार्थ्यांवर या काही ठराविक मंडळींनी आपली दहशत निर्माण करून ठेवली आहे. त्या दाहशतीतून या शाळेला आणि येथील विद्यार्थ्यांना मुक्त करायचे असेल तर सर्वप्रथम येथे असलेल्या बेकायदेशीर पालक शिक्षक संघ सर्वप्रथम बरखास्त होणे आवश्यक आहे.
व्हिडिओ : शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करताना आंदोलक विद्यार्थी. शासन निर्णयातील तरतुदीनुसार पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष हे त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात व ५० % सदस्य या महिला असाव्यात अशी तरतूद आहे. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून येथील पालक शिक्षक संघाची निर्मिती झाली असल्याने विद्यार्थ्यांना माझ्या सारख्या माजी विद्यार्थ्यांकडे न्याय मागण्याची वेळ आली आहे. या शाळेत बेकायदेशीर वर्चस्व प्रस्थापित करून जर कोणी शाळेला आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरीत असेल तर त्यांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बेकायदेशीर व घटनाबाह्य पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करावी व शासन निर्णयातील तरतुदीनुसार नवीन कार्यकारिणीची स्थापना करावी अन्यथा शाळेवर व अस्तित्वातील बेकायदेशीर कार्यकारीनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असेही आप्पासाहेब ढुस यांनी शेवटी बोलताना सांगितले.