साहित्य व संस्कृती
कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांचे साहित्यिक कार्य स्फूर्तीप्रद – सुभाष सोनवणे
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : वडाळा महादेव येथील कवी, गीतकार बाबासाहेब पवार हे ग्रामीण भागातील एक सामाजिक जाणिवेचे साहित्यिक असल्याचे मत नगर येथील गुन्हे शाखा विभागातील माजी पोलीस अधिकारी आणि साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्याबद्दल साहित्यिक सुभाष सोनवणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी सोनवणे बोलत होते. अध्यक्षस्थानी लहानूभाऊ खरात होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या स्वागत प्रास्ताविकात सांगितले की, कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांना नुकताच वाचन संस्कृतीचा पुरस्कार प्राप्त झाला, त्यांच्या सामाजिक साहित्यिक कार्यामुळे ग्रामीण भागात साहित्य चळवळ सुरु आहे, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा विचारांचा आदर्श जपत त्यांनी साहित्य चळवळ गतिमान ठेवली आहे. आपल्या निरपेक्ष आणि सेवाभावी साहित्य क्षेत्रातील बाबासाहेब पवार हे साहित्य वर्तुळात लोकप्रिय आहेत, असे सांगून त्यांचे दिवाळी अंक, कवितासंग्रह, बहुउदेशीय संस्थाकार्य आणि पुरस्कार योजना यांचा आढावा घेतला. सुभाष सोनवणे यांनी बाबासाहेब पवार म्हणजे आपल्याबरोबर अनेकांना साहित्य चळवळीत आणणारे खरे ग्रामसाहित्यिक आहेत. त्यांचा बुके आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. कोतुळ येथील लहानूभाऊ खरात यांनी साहित्यिक कार्याबद्दल डॉ. उपाध्ये, सुभाष सोनवणे आणि बाबासाहेब पवार यांचा गौरव केला. साहित्यिकांनी सेवाभाव आणि समाजसेवकांचा आदर्श ठेवून लेखन आणि कार्य करावे. साहित्य हे समाजप्रबोधनाचे साधन आहेत, पैसा आणि पदाचे नाही. बाबासाहेब पवार यांनी आपला हा सन्मान म्हणजे माझ्या वडाळा महादेव गावाचा आणि साहित्य परिवाराचा सन्मान आहे. नूतन वास्तूत झालेला हा सन्मान आपणास लेखन प्रेरणादायी आहे, असे सांगून आभार मानले.