अहिल्यानगर
कर्तव्याचे संवर्धक डॉ.नारायण नेहे पाटील
संगमनेर तालुक्यात आजमितीला पशुवैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व तंत्रशुद्द डॉक्टर म्हणून नांदुरी दुमाला गावचे डॉ.नारायण नेहे पाटील हे सर्वांना परिचित आहेत. त्यांची सकाळी सुरु झालेली पशुवैद्यकीय सेवा ही रात्रीचे अकरा-बारा वाजेपर्यंत अविरत सुरु ठेवणारा अवलिया म्हणजेच डॉ नेहे पाटील.
ऊन, वारा पाऊस, थंडी, हिंस्र प्राणी या सर्व संकटांना तोंड देत गेली अनेक वर्षांपासून ते आपल्या कर्तव्याची सेवा देत आहेत. सेवा का म्हणायची तर घरपोच उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल हे एक सेवा क्षेत्र आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांचा अनुभव खुप मोठा आहे. जनावराला कोणता आजार झाला हे अनेकदा ते लक्षणांवरच सांगतात व लगेच तातडीने उपचार सुरु करतात. मग त्यात कावीळ असेल, मस्टडी असेल, विषबाधा असेल किंवा जनावराच्या पोटात तार गेलेली असेल अशा अनेक आजारांतून त्यांनी जनावरांना नवसंजीवनी दिली आहे.
प्रसंगी अनेक किचकट शस्रक्रियाही त्यांनी यशस्वी केल्या आहेत. भयानक आजाराने काही जनावरे दगावली असतीलही. पण कित्तेक वेळा तर शेतकऱ्याने जनावराची अपेक्षा सोडून देऊनही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जनावरास योग्य उपचारातून पुनर्जन्मच मिळवून दिला. याची अनेक उदाहरणं आहेत. गरिब असो श्रीमंत असो त्यांनी शक्यतो स्वतःहुन कधीच फी साठी शेतकऱ्याला तगादा लावला नाही. पशुसेवा करत असताना त्यांनी व्यावहारिक माणसही ओळखली. ते दररोज सेवा तर देतातच पण त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून त्यांनी काही नवतरुणांना आपल्या बरोबर घेऊन डॉक्टर बनविले आहे. पशुवैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी समाजहित जोपासण्याचंही काम केलं आहे. आपल्या व्यस्त सेवेतही ते आजही सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. तसेच आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी तालुक्यात मैत्रीचे मोठं जाळं विणलेले आहे.
नांदुरी दुमाला, सांगवी, मिरझापूर, निमगाव पागा, पेमगिरी तसेच इतर गावांतील वाड्या वस्त्यांवर ते आजही तेवढ्याच नेटाने सेवा देत आहेत याचा खरोखरच अभिमान वाटतो. भविष्यातही ही सेवा अविरत सुरु रहावी. कर्तव्य पशुसंवर्धन सेवेच्या माध्यमातून ते मुक्या जनावरांची सेवा तर करतातच पण जणू काही ते दररोज आपल्या कर्तव्याचेही संवर्धन करत आहेत. आज 20 जुलै डॉ.साहेबांना वाढदिवसाच्या कर्तव्यरुपी हार्दिक शुभेच्छा…!
बाळासाहेब भोर; अ.भा.क्रांतिसेना,संगमनेर